Pages

बालगीते - संग्रह १

बालगीते - संग्रह 

बालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय.ही सर्व गीते मी फक्त संग्रहीत केली असुन माझ्या शिक्षक बांधवांना व माझ्या सर्व चिमुकल्या विद्यार्थी मित्रांसाठी माझ्या ब्लॉगवर प्रसारित करीत आहे. यातुन वरील मान्यवरांच्या व इतर कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही.

सांग मला रे सांग मला आई..

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?
आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !
गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !
घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !
कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !
निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !
आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !
त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !
बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !
बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !
धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !
गीत - ग. दि. माडगूळकर

-----------------------------------------------------------------

 उठा उठा चिऊताई सारीक...


सारीकडे उजाडले
डोळे कसे मिटलेले
अजूनही अजूनही !
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही !
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे !
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या !
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिआ दूर जाई
भूर भूर भूर भूर !
गीत - कुसुमाग्रज

----------------------------------------------------------------------------


 नको ताई रुसू 
रुसु बाई रुसु कोपर्‍यात बसु
आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू
आहा ..... ही ही ....... हो हो
आता तुमची गट्टी फू
लाल बाल बारा वर्ष बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी
आमचा राजू का रुसला, आमचा राजू का रुसला
सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला ?
गाल गोबरे गोरे गोरे, लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी या चंद्र्मुखाचा, उदास का दिसला
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला
बावन पत्ते बांधु बाळा, शर्यत खेळू घोडा घोडा
घरादाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला
चिमणी खाई मोती-दाणे, गोड कोकीळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा, अबोल का बसला
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला
गीत - सुधीर मोघे

--------------------------------------

 एक होता काऊ , तो चिमणी..

एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला
"मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ"
एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला
"तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट"
एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली
"तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस"
एक होती गाय, तिने चिमणीला विचारले
"तुझे नाव काय, तुझे नाव काय, तुझे नाव काय ?"
एक होते कासव, ते चिमणीला म्हणाले
"मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव"
गीत - मंगेश पाडगावकर
-------------------------------------------------------------------------------------------------------------
टप टप टप टप टापा टाकीत 
टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !
उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !
घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !
सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !
गीत - शांता शेळके
--------------------------------------------------------

आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नही 

आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई
तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक, आईच्या पायी
कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी, माय जिजाबाई
नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा, होई उतराई
गीत - ग. दि. माडगूळकर
-------------------------------------------------------
एका तळ्यात होती बदके 

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक
कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
एके दिनी परंतू पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक
गीत - ग. दि. माडगूळकर

-------------------------------------------------
किलबिल किलबिल पक्षी बोलती 
किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुले बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई !
गाव पाहिला बाई! एक मी गाव पाहिला बाई !
त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे
सारे हसती, गाती नाचती, कुणी रडके नाही
नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो, पडो, धडपडो, लागत कोणा नाही
तिथल्या वेली गाणी गाती, पर्‍या हसर्‍या येती जाती
झाडावरती चेंडु लटकती, शेतामधुनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही
गीत - शांता शेळके
----------------------------------------------------------
गोड गोजरी लाज लाजरी 
गोड गोजरी, लाज लाजरी ताईच होणार नवरी
फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला ग दारी
करकमलाच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे
हळदीहुनही पिवळा बाई रंग तुला तो साजे
अंगणी फुगडी नाचे,
रूप पाहुनी तुझे, साद घाली मणी मंगळ सरी
भरजरीचा शालू नेसुनी, जाई, ताई आमुची गौरी
लग्न-मंडपी तिच्या समोरी, उभी तिकडची स्वारी
अंतरपाट धरी, शिवा पार्वती वरी, लाडकी ही जाई ताई दुरी
गीत - पी. सावळाराम
----------------------------------------------------------
इवल्या इवल्याशा, टिकल्या-टिकल्यांचे
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
निळी निळी वाट, निळे निळे घाट
निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळ पाट
निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी
चांदीच्या झाडांना सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी
देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊ मऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्यांची हंडी, चांदण्यांची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी
गीत - ग. दि. माडगूळकर
------------------------------------------------
कावळ्यांची शाळा
रंग त्यांचा काळा
दंगा करत पहात होती
करुन तिरका डोळा.
इतक्यात तिथे आले
एक चिमणीचे पिल्लू
कावळ्यांची पोरं ओरडली
चालू लाग रे टिल्लू.
पिल्लू घाबरुन गेलं
थरथरत उभं राहिलं.
कावळी होती बाई
माया तिची दूध सायी.
कावळी म्हणे, ’चूप’
हाताची घाला घडी
वाचू लागा घडाघडा
नाहीतर, छडीवर बसेल छडी.
कावळी पिल्लाजवळ आली
पिल्लाला घेई पंखाखाली
माझी पोरं वांड भारी
तू आपला जाई घरी
पिल्लाला घेऊन पंखाखाली
कावळी झाडाजवळ आली.
समोर चिमणा-चिमणी पाहून
पिल्लू आलं पंखाखालून
पिल्लू म्हणे आईला
घरी नेऊ कावळीला.
चिमणीनं उडवलं नाक
चिमण्याचा भडकला ताप
आपण जातीने एवढे मोठे
कावळीचे कूळ किती छोटे
करुन असले चाळे
तोंडाला लावतोस काळे.
पिल्लू झालं व्यथित
काय ही जगाची रीत ?
माया करते कावळी
तिची शोधायची का जातकुळी ?
कसले थोर, कसले नीच
अंतर्यामी एकच बीज.
कावळी आई कावळी आई
दुःखी नको होऊ
मी होईन मोठ्ठा
मग आपण मिळून राहू.
---------------------------------------------------------------
आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई
तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक, आईच्या पायी
कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी, माय जिजाबाई
नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा, होई उतराई
गीत - ग. दि. माडगूळकर
---------------------------------------------------------------------------------------------
टप्‌ टप्‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

भिर्‌ भिर्‌ भिर्‌ भिर्‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे !
कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !
दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !
गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले !
फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनि सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !
गीत - मंगेश पाडगावकर
-------------------------------------------
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेखा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुनी घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामन खाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया
गीत - ग. दि. माडगूळकर

No comments:

Post a Comment